(मुंबई)
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत पुन्हा एकदा ‘तुंबई’ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, सामान्य मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. आज मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजी देखील पावसाचा जोर कायम आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांना आज सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकारांतर्गत महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. संबंधित आस्थापनांनी शक्य असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी, असेही निर्देश पालिकेने दिले आहेत. “गरज नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये,” असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी
आजच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार, मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि पालघर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनाही स्थानिक प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’
भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक रेल्वे मार्गांवर सेवा संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी ट्रेन्स उशिराने धावत आहेत, तर काही ठिकाणी रद्दही करण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांनाही अडथळ्यांना सामोरे जावे लागते आहे. विशेषतः लो-लाइन परिसरांमध्ये जलतरणसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला गेला आहे. चाकरमानी अडकून न पडावेत आणि कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. त्याचबरोबर दृश्यमानता कमी झाली आहे. सावधगिरी म्हणून मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे. अनावश्यक प्रवास टाळा. काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करा आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, कृपया 100 / 112/ 103 ला फोन करा. आमचे अधिकारी आणि कर्मचारी उच्च सतर्क आहेत आणि मदत करण्यास तयार आहेत. तुमची सुरक्षितता नेहमीच प्रथम येते, असं अवाहन मुंबई पोलिस आयुक्तांनी केलं आहे.

