(मुंबई)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ‘शिवशाही’ या बहुचर्चित वातानुकूलित बस सेवेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. खासगी ट्रॅव्हल्सना तीव्र स्पर्धा देणारी आणि प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरलेली ‘शिवशाही’ सेवा आता टप्प्याटप्प्याने बंद होणार असून, तिचं रूपांतर ‘हिरकणी’ या नव्या बस सेवेत करण्यात येणार आहे. पुण्याच्या दापोडी येथील एसटी कार्यशाळेत पहिली रूपांतरित ‘हिरकणी’ बस तयार झाली असून, ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्यातील एकूण ७९२ शिवशाही बस ‘हिरकणी’मध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत.
एसीमुळे इंजिनवर ताण, देखभाल खर्च वाढला
शिवशाही बसमध्ये असलेल्या वातानुकूलन यंत्रणेमुळे इंजिनवर अतिरिक्त ताण येत होता. परिणामी बसच्या देखभालीचा खर्च वाढला आणि कार्यक्षमता घटली. त्यामुळे एसटीने शिवशाहीतील एसी काढून, इंधन बचत व इंजिनचे आयुष्य वाढवण्यासाठी नवीन ‘हिरकणी’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हिरकणी’ बस एसीविनाच असून त्यात ४४ प्रवासी आसनांची व्यवस्था असणार आहे. तसेच बसच्या रंगरूपातही बदल करण्यात येणार असून, नव्या ब्रँडिंगसह ती प्रवाशांसमोर सादर होईल.
‘शिवशाही’ सेवा १० जून २०१७ रोजी मुंबई-रत्नागिरीमार्गावर सुरू झाली होती. सुरुवातीस ती प्रचंड लोकप्रिय ठरली होती आणि एसटीच्या ताफ्यात खासगी ट्रॅव्हल्सना स्पर्धा देणारा मजबूत पर्याय म्हणून उदयास आली. राज्यातील ७५ मार्गांवर ही बस सेवा चालवण्यात येत होती. मात्र, केवळ आठ वर्षांतच ही सेवा विविध अडचणींमुळे अडखळू लागली आणि अखेर तिला टप्प्याटप्प्याने सेवेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुण्याच्या दापोडी वर्कशॉप आणि छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा केंद्रात ‘हिरकणी’ बसमध्ये रूपांतरणाची कामं वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत टाटा कंपनीच्या एका शिवशाही बसचं यशस्वी रूपांतर करण्यात आलं आहे. लवकरच उर्वरित बसाही या नव्या स्वरूपात रस्त्यावर धावू लागतील.