(रत्नागिरी / प्रतिनिधी)
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त झालेल्या बहुचर्चित प्रकरणात आरोपी फारूक अल्लारखा कच्छी याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अ. म. आंबळकर यांनी कठोर अटींसह हा आदेश दिला.
या प्रकरणात २६ मे २०२६ रोजी मध्यरात्री संगमेश्वर येथील परेख पेट्रोल पंपासमोर संशयास्पद अवस्थेत उभी असलेली एक वॅगनआर कार पोलिसांना आढळली होती. कारमध्ये कोणीही नसल्याने संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत वाहन पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरएमडी (RMD) पानमसाला व गुटखा आढळून आला. या मालाची किंमत सुमारे २.४६ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान वाहनाची नोंदणी आरोपी फारूक कच्छी यांच्या नावावर असल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही अवैध साठा आणि वाहतुकीच्या घटना अधूनमधून उघड होत असल्याने प्रशासनासमोरील आव्हान अधिक अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, जामीन अर्जावरील सुनावणीत आरोपीच्या वतीने तपास जवळपास पूर्ण झाला असून आरोपीच्या प्रत्यक्ष ताब्यातून कोणताही आक्षेपार्ह माल जप्त झालेला नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच तो न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करेल, असेही सांगण्यात आले. याउलट सरकारी पक्षाने आरोपी हा गुटखा व्यवसायाशी संबंधित असून साक्षीदारांवर दबाव आणण्याची किंवा फरार होण्याची शक्यता असल्याचा आक्षेप नोंदविला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपास कागदपत्रांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने तपास जवळपास पूर्ण झाल्याचे नमूद केले. आरोपीच्या पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचे निरीक्षण नोंदवत, आवश्यक त्या कठोर अटी घालून त्याची सुटका करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने आरोपीची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व तितक्याच रकमेच्या एका जामीनदारावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी व बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क न साधणे, पुराव्यात छेडछाड न करणे आणि भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा न करण्याच्या अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.

