(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुसळधार पावसाने संगमेश्वर परिसरात पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले असून, राष्ट्रीय महामार्ग कामातील गंभीर त्रुटींमुळे एसटी स्थानक परिसर अक्षरशः चिखल आणि वाहत्या पाण्याच्या विळख्यात सापडला आहे. स्थानक परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून वाहत असल्याने प्रवाशांना दररोज जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्ग प्रकल्पांतर्गत सोनवी पुलाजवळ सेवा रस्ता तयार करताना पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था न केल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. डोंगरउतारावरून वाहून येणारे पावसाचे पाणी आणि माती थेट एसटी आगार परिसरात घुसत असल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे.
स्थानिकांच्या मते, संबंधित ठेकेदाराने आवश्यक गटारे आणि ड्रेनेज सिस्टमची अंमलबजावणी न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, मुसळधार पाऊस सुरू होताच सेवा रस्ता पाण्याच्या प्रवाहासारखा बदलतो आणि तोच प्रवाह थेट आगारात शिरतो.
प्रवाशांचे हाल तीव्र, दररोज अपघाताचा धोका
स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना चिखलातून वाट काढणे अत्यंत कठीण झाले आहे. वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले आणि विद्यार्थी यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे तोल जाऊन घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. सामान घेऊन बस पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे.
“मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?”
स्थानिक आणि प्रवासी वर्गातून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सध्या सुरू असलेली परिस्थिती पाहता गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
एसटी प्रवासाकडे प्रवाशांची पाठ; खाजगी वाहतुकीकडे कल वाढला
स्थानकातील अस्वच्छता आणि जीवघेणी परिस्थितीमुळे अनेक प्रवाशांनी एसटी बस प्रवास टाळण्यास सुरुवात केली आहे. अनेक प्रवासी आता खाजगी वाहतूक, रिक्षा आणि वडाप गाड्यांचा पर्याय निवडत आहेत. यामुळे एसटी आगारातील प्रवासी संख्या लक्षणीय घटली असून, प्रवासी वळल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
एसटी महामंडळाला आर्थिक फटका; तात्काळ उपाययोजनांची मागणी
प्रवाशांच्या घटत्या संख्येमुळे एसटी महामंडळाला महसुलात नुकसान सहन करावे लागत आहे. दुसरीकडे, महामार्ग ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामाचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर थेट दिसत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून तात्काळ पाण्याचा निचरा व्यवस्था उभारणे, सेवा रस्त्याचे योग्य नियोजन करणे आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

