(संगमेश्वर / एजाज पटेल)
शिवधामापूर (भुसेवाडी) येथील रहिवासी कमलाकर शंकर गायकर (वय ५८) यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, २३ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
कमलाकर गायकर यांचा पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. मात्र, सुमारे दोन-तीन महिन्यांपूर्वी पत्नीवर संशय घेऊन त्यांनी वाद निर्माण केला होता. या वादात त्यांनी पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या दिवसानंतर दोघांमध्ये बोलणे बंद झाले होते. त्यामुळे गायकर यांची पत्नी दुसऱ्या ठिकाणी वेगळे राहत असलेल्या मुलासोबत राहू लागली होती. दरम्यान, कमलाकर गायकर स्वतःच्या घरात हे एकटेच राहत होते आणि आपला स्वयंपाक करून जेवण करत होते.
२३ जुलै रोजी सकाळी त्यांच्या गुरांनी गोठ्यात हंबरायला सुरुवात केली. गुरांना चारण्यास वडिल गेले नसल्याचे लक्षात येताच मुलगा ऋषिकेश याने गोठ्याकडे जाऊन पाहणी केली. त्यानंतर तो घराकडे गेला असता दरवाजा आतून न लागलेला असल्याने तो ढकलून आत गेला. तेव्हा त्याला त्याचे वडील हॉलमध्ये सिलिंग फॅनच्या हुकाला नायलॉन दोरीने लटकलेले दिसले. त्याने आवाज दिला, हाका मारल्या; मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची खात्री झाली.
ऋषिकेश यांनी ही माहिती तत्काळ गावचे पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांनी माखजन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांना कळवले. साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमकी कारणमीमांसा करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

