(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा महामार्ग प्रकल्प गेली तब्बल १७ वर्षे रखडलेला असताना निढळेवाडी ग्रामस्थांचा संयम आता संपत आला आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार प्रत्यक्षात जनतेसाठी त्रासदायक ठरत असल्याने ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे. “हा विकास की भकास?” असा थेट सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘हॉटेल मैत्री पार्क’ समोर खोदकाम करताना ग्रामपंचायतीने गावातून महामार्गाकडे जाण्यासाठी उभारलेली पाखाडी उद्ध्वस्त करण्यात आली. त्या वेळी संरक्षक भिंत आणि पर्यायी पाखाडी तातडीने उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही ही आश्वासने कागदावरच राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या मते, संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांचा कारभार बेफिकीर व बेजबाबदार आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांकडून केवळ शब्दांचे आश्वासन मिळाले, प्रत्यक्ष काम मात्र शून्य आहे. पाखाडी नसल्यामुळे विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच जीव धोक्यात घालून चिखलातून, उतारातून आणि अपूर्ण रस्त्यावरून महामार्ग गाठावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच भयावह होते.
“महामार्गासाठी खर्च होणारे लाखो रुपये जर अशा पद्धतीने वाया जात असतील, तर सामान्य नागरिकांनी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मते हा प्रकार थेट जनतेच्या सुरक्षेशी खेळणारा असून विकासाच्या नावाखाली भकासपणालाच खतपाणी घातले जात आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि बांधकाम मंत्र्यांनी दिलेले लेखी आदेश व आश्वासनेही संबंधित अधिकाऱ्यांनी धुडकावून लावल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “जर मंत्र्यांचे आदेशच गांभीर्याने घेतले जात नसतील, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या सततच्या दुर्लक्षामुळे अखेर ग्रामस्थांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच निढळेवाडीची पाखाडी तातडीने उभारावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे की, महामार्गाच्या कामातील विलंब, बेफिकीर खोदकाम आणि नागरिकांकडे होणारे दुर्लक्ष हा विकास नसून थेट जनतेची फसवणूक आहे. ग्रामीण जीवनात निर्माण झालेली अस्वस्थता, अपघाताची भीती आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे उफाळलेला हा संताप आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. “आता तरी ठोस कारवाई झाली नाही, तर विकासाचा हा ढोंगी तमाशा कायमस्वरूपी ठरणार,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

