( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस मार्गावरील डिंगणी पोलीस चौकीजवळ असलेल्या धोकादायक वळणावर आज सकाळी पुन्हा एक कार अपघातग्रस्त झाली. विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत या वळणावर झालेला हा आठवा अपघात आहे. या मार्गावरील हे वळण वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत असून अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये.
हे वळण अत्यंत तीव्र असून, त्याबद्दल कोणतीही पूर्वसूचना देणारे फलक किंवा सावधगिरीची चिन्हे नसल्याने वाहनचालकांना वेळेत वळणाचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक वाहने थेट दरीत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आजच्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या धोकादायक वळणावर योग्य दिशादर्शक फलक, गतिरोधक (स्पीड ब्रेकर) आणि संरक्षक कठडे बसवणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या मार्गावर दर आठवड्याला अपघात होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने रए चरित उपाययोजना न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा ईशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.