(रत्नागिरी / वार्ताहर)
देशाची सुरक्षा, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संविधान सन्मान मंच, रत्नागिरी यांच्या वतीने आज (गुरुवार) भव्य ‘राष्ट्ररक्षण मूक पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेला रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला (मारुती मंदिर) अभिवादन करून मूक पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पदयात्रेने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरात या पदयात्रेची सांगता झाली. संपूर्ण पदयात्रेदरम्यान सहभागी नागरिकांनी शांतता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवत राष्ट्रहिताचा संदेश दिला. या पदयात्रेत विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, युवक-युवती, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या उपक्रमातून देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणाऱ्या कृत्यांचा निषेध, भारतीय संविधानाचा सन्मान, राष्ट्रहिताचे संरक्षण आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचा संदेश देण्यात आला. संविधानातील लोकशाही मूल्यांवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पदयात्रेदरम्यान सहभागी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने राष्ट्रभक्ती, संविधाननिष्ठा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी किंवा गोंधळ न करता शिस्तबद्ध वातावरणात ही मूक पदयात्रा पार पडल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
संविधान सन्मान मंचाच्या वतीने भविष्यातही राष्ट्रहित, संविधानाचे संरक्षण, सामाजिक सौहार्द आणि लोकशाही मूल्यांबाबत जनजागृती करणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

