(राजापूर / प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीला लगाम घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. राजापूर तालुक्यातील पन्हाळी तर्फे सौंदळ येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ लगतच्या जंगलमय परिसरात छापा टाकून तब्बल १ कोटी ९१ लाख ९६ हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा आणि सहाचाकी कंटेनर जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध मद्य वाहतुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पन्हाळी तर्फे सौंदळ येथील हॉटेल समर्थजवळ गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगल परिसरात अवैध मद्यसाठा असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून संबंधित कंटेनरची तपासणी केली. यावेळी कंटेनरमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडच्या मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. तपासणीत कंटेनरमधून तब्बल १ हजार ६०० पुठ्ठ्यांचे बॉक्स आणि १३ हजार ८२४ बल्क लिटर मद्य जप्त करण्यात आले. या मद्याची किंमत सुमारे १ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपये, तर कंटेनरसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ९१ लाख ९६ हजार रुपये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.
या कारवाईदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. कंटेनरवर प्रथमदर्शनी राजस्थानचा आरजे १४ जीआर ६००४ असा क्रमांक असलेली नंबर प्लेट लावण्यात आली होती. मात्र अधिक तपासणी केली असता त्या बनावट नंबर प्लेटखाली कंटेनरचा मूळ क्रमांक एचआर ६९ ई ३४९० असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अवैध मद्य वाहतुकीसोबतच वाहनाची खरी ओळख लपविण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई सुरू करताच कंटेनरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्यसाठा नेमका कुठून आणण्यात आला? तो महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पोहोचविण्यात येणार होता? या संपूर्ण व्यवहारामागे सूत्रधार कोण आहे? बनावट नंबर प्लेटचा वापर करून यापूर्वीही अशाच प्रकारे मद्याची वाहतूक करण्यात आली आहे का, याचा तपास उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त स्नेहलता श्रीकर आणि रत्नागिरी अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान अतुल वसावे, विशाल विचारे, मानस पवार आणि अनुराग बर्वे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
माहिती देण्याचे आवाहन
जिल्ह्यात कुठेही हातभट्टीची दारू, परराज्यातील अवैध मद्यसाठा किंवा बनावट मद्याची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी ८४२२००१९३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा १८००२३३९९९९९ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.


