(रत्नागिरी / लांजा प्रतिनिधी)
लोकवस्तीच्या उंबरठ्यावर घनकचरा प्रकल्प रेटण्याच्या प्रयत्नाविरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांचा संयम अखेर संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे. तब्बल ९३ दिवसांचे साखळी उपोषण करूनही प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता पुन्हा एकदा संघर्षाचा बिगुल फुंकला आहे. १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे निवेदन मंगळवारी तहसीलदार प्रियांका ढोले यांच्याकडे सादर करण्यात आले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोत्रेवाडी वस्तीलगत प्रस्तावित करण्यात आलेला घनकचरा (डम्पिंग ग्राउंड) प्रकल्प हा घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ मधील निकषांनाच हरताळ फासणारा आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रस्ताव अयोग्य ठरविला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार १७ फेब्रुवारी २०२१ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबत पत्रही दिले होते. त्याच अनुषंगाने २६ मार्च २०२१ रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव रद्द झाल्याची लेखी माहिती ग्रामस्थांना दिली होती. मात्र, एकदा रद्द झालेलाच प्रस्ताव पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने पुढे आला? असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. नियमबाह्य प्रस्तावाला वैधतेचे कवच चढविण्यासाठी चुकीचे अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा गंभीर आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, नियोजित जागेला रस्ताच नसताना त्या जागेचे खरेदीखत करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण व्यवहाराची खातेनिहाय सखोल चौकशी करून तत्कालीन संबंधित मुख्याधिकारी आणि माजी नगराध्यक्षांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणारा आणि पर्यावरणावर घाला घालणारा कचरा प्रकल्प वस्तीजवळ उभारणे हे शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या उद्दिष्टांनाच छेद देणारे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रकल्प लोकवस्तीपासून दूर, नियमसंगत आणि पर्यावरणपूरक ठिकाणी तातडीने स्थलांतरित करण्यात यावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
“९३ दिवसांच्या अहिंसक आंदोलनालाही जर प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा स्पर्श झाला नसेल, तर लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागेल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला संबंधित अधिकारीच जबाबदार असतील,” असा स्पष्ट आणि निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती लांजा पोलीस ठाणे आणि लांजा नगरपंचायतीलाही देण्यात आल्या असून, आता स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या लाक्षणिक उपोषणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन ग्रामस्थांच्या आक्रोशाची दखल घेणार की पुन्हा एकदा आश्वासनांच्या पोकळ वलयात हा प्रश्न अडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

