(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड आणि श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट, गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात 111 नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबाराम माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा मंदिर ट्रस्टचे सक्रिय कार्यकर्ते राज देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.
शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके, आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर, राजेंद्र रणसे, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) मनाली तारवे, श्रीमती ठाकरे, एएनएम अश्विनी गोवळकर, श्रीमती कदम, लॅब टेक्निशियन श्रुतिका मोहित, आरोग्य सेवक जाधव व कासेकर, समता फाउंडेशनचे नितेश शेट्ये, नेत्रतज्ज्ञ मैथिली मेहतर, मदतनीस सांची गवाणकर, आशा सेविका गावणकर तसेच सीआरपी गुरव यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली.
या शिबिरामध्ये नागरिकांची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, ईसीजी, रक्त तपासणी, वजन व उंची मोजणी, नेत्र तपासणी तसेच विविध आजारांबाबत आरोग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी शिबिरातील सुविधांचा लाभ घेत आरोग्याबाबत आवश्यक माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड आणि श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, मान्यवर आणि लाभार्थी नागरिकांचे आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

