(लांजा)
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण काम कासवाच्या गतीने सुरू असून त्या कामास गती देणे आवश्यक आहे, याच अनुषंगाने त्यासाठी लांजा बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्यासाठी गुरुवारपासून धडक कारवाई सुरू झाली आहे. महामार्ग प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याने बांधकामे काढून घेण्यासाठी व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती.
मुंबई-गोवा महामार्गाचे या भागातील गेली अनेक वर्षे काम रखडले होते. आता या महामार्गाच्या कामाला चांगलीच गती मिळाल्याने काम प्रगतिपथावर आले आहे. लांजा शहराच्या मध्यभागातून हा महामार्ग जात आहे. मात्र, या रस्त्याच्या दुतर्फा छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या पुढे छप्पर काढले होते. महामार्ग प्रशासनाने चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेवर छोट्या व्यापाऱ्यांनी खोके, टपऱ्या उभारल्याने महामार्गाच्या कामाला व वाहतुकीलाही अडथळा होत होता.
शहरात कोर्ले फाटा ते साटवली रोडपर्यंत उड्डाणपूल होत असल्याने त्याचे काम मोठ्या जोमाने सुरू झाले आहे उडाणपुलाचे पिलर उभारण्याचे काम ९० टक्के पूर्ण झालेले आहे. हे काम करीत असताना पर्यायी मार्गासाठी संपादित केलेल्या जागेवर खोके, टपऱ्या व अनेक दुकानांचे छप्पर येत असल्याने ते हटवणे गरजेचे होते. त्यासाठी महामार्ग प्रशासनाने अनधिकृत बांधकामे १ जानेवारीपर्यंत काढून घेण्याची सूचना संबंधित दुकानदारांना केली होती. मात्र, कोणीही आपली अतिक्रमणे न काढल्याने गुरुवारी सकाळी ११:३० वाजल्यापासून महामार्ग प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात बुलडोझरच्या साहाय्याने अतिक्रमणे पाडण्यास सरुवात केली.यावेळी तहसीलदार प्रियांका ढोले, पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिदक्षता पोलिस दलाच्या दोन तुकड्या तसेच अनेक पोलिस तैनात करण्यात आले होते.
मोहीम सुरूच राहणार
सकाळपासून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम महामार्गाच्या दुतर्फा सायंकाळपर्यंत सुरू होती. या धडक मोहिमेमुळे इतके दिवस दुर्लक्ष करणाऱ्या व्यापाऱ्यांची अतिक्रमण काढून घेण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ उडाली होती. आणखी काही दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.