(लांजा)
तालुक्यातील मौजे कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवानाची मोठी चोरतूट झाल्याचे वन विभागाच्या कारवाईत उघड झाले आहे. वनपाल आणि वनरक्षक यांच्या फिरतीदरम्यान दि. ३० ऑगस्ट रोजी सात साग झाडांची अवैध चोरतूट झाल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी काही लाकूड जागेवर तर काही फरार करण्यात आले होते. या घटनेनंतर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पुढे नेताना दि. २४ सप्टेंबर रोजी सात संशयित आरोपींचा पर्दाफाश झाला.
मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रूघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर आणि शुभम रवींद्र गुरव (सर्व रा. कुंभवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी रातोरात क्रेनच्या साहाय्याने ट्रकमध्ये लाकूड भरून कुर्णे येथून कुंभवडे येथे वाहतूक केली. त्यानंतर मुद्देमाल दुसऱ्या ट्रकमध्ये टाकून मौजे माडबन येथील पठार भागात लपवून ठेवला होता. आरोपी मनोज पाटणकर याच्या कबुलीजबाबानंतर ही माहिती उघडकीस आली.
या कारवाईत वन विभागाने एकूण ३१ साग झाडांचा (७.४९५ घ.मी.) मुद्देमाल जप्त केला असून, त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ३ लाख १४ हजार ७९० रुपये इतकी आहे. हा माल वनाधिकारी राजापूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच लांजा येथे क्रेन क्रमांक MH09GM0452 जप्त करण्यात आली असून, या गुन्ह्यात वापरलेल्या इतर वाहनं आणि साधनसामग्रीचा तपास सुरू आहे.

वन विभागाच्या वतीने विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना अथवा वन्यप्राणी अडचणीत आल्यास नागरिकांनी त्वरित वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा.

