(लांजा)
शाळांना सुट्टी असल्याने मुंबईत कामानिमित्त राहत असलेला कोकणी बांधव आपल्या गावी परतत आहे. यातच कोकण रेल्वे मार्गावर चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. लांजातील आपल्या गावी जात असलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११:३० ते १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:३० च्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी रमाकांत गणपत आयरे (वय ५६, रा. इंदिरा नगर ०२, के.डी. रोड, मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले पश्चिम, मुंबई ५६) यांनी दिली आहे. आयरे हे ट्रेन क्रमांक २०१११ कोकणकन्या मेल एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक ३ मधील सीट नंबर ६३ वरून दादर ते विलवडेपर्यंत प्रवास करून त्यांनी विलवडे रेल्वे स्टेशनपासून रिंगणे गावापर्यंत रिक्षाने प्रवास केला. प्रवास करतेवेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ९२ हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लक्ष नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लांबवली. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०२:१३ वाजता करण्यात अली आहे. याबाबत आता पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
मागील तीन-चार महिन्यांमध्ये रेल्वेमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, रेल्वे प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहेत.