(मुंबई / रत्नागिरी)
अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावित प्रक्रियेविरोधात राज्यभरातील विविध सामाजिक संघटना आणि आंबेडकरी चळवळीतील घटक एकवटले असून, ३० जून रोजी मुंबईत भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि अन्य समविचारी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर समितीच्या शिफारशींनुसार अनुसूचित जातींचे अ, ब, क आणि ड अशा गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेच्या घटनात्मक, कायदेशीर आणि सामाजिक परिणामांबाबत व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने २५ एप्रिल रोजी दादर येथील डॉ. आंबेडकर भवनात जाहीर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राज्यभर विविध शाखांमार्फत प्रबोधनपर कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात येत आहेत.
दरम्यान, विविध अनुसूचित जाती संघटना आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत “आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती” स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने २२ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत आनंदराज आंबेडकर, डॉ. भीमराव य. आंबेडकर, आमदार राजकुमार बडोले, बबनराव घोलप, ॲड. डॉ. सुरेश माने आणि बाबुराव माने यांनी समितीची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना, समता सैनिक दल, बौद्धजन पंचायत समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, राष्ट्रीय चर्मकार संघ, भीम आर्मी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, आयबीसीसेफ तसेच अन्य अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपवर्गीकरणामुळे कोणत्याही जातीचा प्रत्यक्ष लाभ होणार नसून अनुसूचित जाती समाजातील ऐक्याला तडा जाऊन अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. संविधानाने मान्यता दिलेल्या समतेच्या तत्त्वांना बाधा पोहोचविणारा हा प्रयत्न असल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ३० जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सहभागी नागरिक मेट्रो सिनेमा परिसरात एकत्र येणार असून, दुपारी २ वाजता महामोर्चाला प्रारंभ होईल. मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाजवळील या ठिकाणाहून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरापर्यंत जाईल. त्यानंतर तेथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महामोर्चाच्या नियोजनासाठी ॲड. डॉ. एस. के. भंडारे, बी. एच. गायकवाड, ॲड. डॉ. एस. एस. वानखडे, अशोक कदम, डी. एम. आचार्य, यू. जी. बोराडे, स्वाती शिंदे, विलास वानखडे, चंदाताई कासले आणि प्रदीप कांबळे यांचा समावेश असलेल्या व्यवस्थापन समन्वय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर राज्यातील आंबेडकरी, सामाजिक आणि विविध संघटनांचे लक्ष लागून राहिले असून, ३० जूनचा महामोर्चा या विषयावरील पुढील राजकीय आणि सामाजिक घडामोडींसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

