(मुंबई)
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईत नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगर, नाशिक आणि पुण्यापर्यंत पोहोचल्याने राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे. CBI ने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धनंजय लोखंडे या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर आता पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून मनीषा वाघमारे (वय ४६) या महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांना संशयितांपर्यंत पोहोचवण्यात तिची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर कनेक्शन उघड
NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील डॉ. शुभम मधुकर खैरनार याला सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान धनंजय लोखंडे याचे नाव समोर आल्यानंतर CBI पथकाने त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान धनंजयचे शेवटचे लोकेशन पुण्यात आढळून आले होते. मात्र कारवाईची माहिती मिळताच तो पुण्यातून निघून राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर परिसरात लपल्याची माहिती समोर आली. स्थानिक पोलिसांनी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतल्यानंतर पहाटे CBIच्या पथकाकडे सुपूर्द केले.
WhatsApp चॅट आणि कॉल रेकॉर्ड्स तपास यंत्रणांच्या हाती
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मनीषा वाघमारे हिचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक उपकरणे जप्त केली आहेत. तपासादरम्यान मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे यांच्यातील WhatsApp चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स समोर आले आहेत. विशेष म्हणजे पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतरही दोघे संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मनीषा विद्यार्थ्यांना धनंजयपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिला सायंकाळपर्यंत CBIच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
१० लाखांत पेपर विक्रीचा आरोप
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांनी मिळून NEET पेपरफुटीचा कट रचल्याचा संशय आहे. धनंजयने कथितरित्या NEETचा पेपर शुभम खैरनारला १० लाख रुपयांत विकला. त्यानंतर शुभमने तोच पेपर टेलिग्रामद्वारे १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.
पुण्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे काम
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय लोखंडे याने कर्नाटकातील मंगळूर येथे BAMS शिक्षण पूर्ण केले असून तो मागील चार ते पाच वर्षांपासून पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता. वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि कन्सल्टिंगचे काम तो करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान, त्याचे वडील शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असून कुटुंबीयांनी “तो असे काही करेल असे वाटत नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या प्रकरणावर अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.
अनेक राज्यांत CBIची चौकशी
नाशिकमधील संशयित शुभम खैरनारला घेऊन CBI टीम मध्यरात्री मुंबईकडे रवाना झाली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्राबरोबरच हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणा राज्यांपर्यंत पोहोचला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने सखोल चौकशी सुरू केली असून राजस्थानची राजधानी जयपूर येथून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल या तिघा भावंडांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच यश यादव नावाच्या व्यक्तीला हरियाणातील गुरुग्राममधून अटक केली. देशभरात चर्चेत असलेल्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

