(पुणे)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला युनायटेड स्टेट्स ऑफ मिसुरी येथील युनिव्हर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने एक अद्वितीय सन्मान प्रदान केला आहे. एका वर्षात सर्वाधिक भाविकांनी भेट दिलेल्या मंदिराचा जागतिक विक्रम अधिकृतपणे नोंदवून त्याचे प्रमाणपत्र गणेशोत्सवानिमित्त ट्रस्टला देण्यात आले. सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे विश्वस्त यांनी हा मानाचा सन्मान स्वीकारला.
हा गौरव मंदिराला वर्षभर देश-विदेशातून भाविक सतत दर्शनासाठी येत असल्याची अधिकृत दखल म्हणून देण्यात आला आहे. दगडूशेठ गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात पसरलेली असून, विविध देशांतून भक्त मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.
या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आता जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या आध्यात्मिक स्थळांपैकी एक म्हणून नोंदले गेले आहे. युनिव्हर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत समितीने हा विक्रम सत्यापित करून प्रमाणित केला आहे.

