(नवी दिल्ली)
अमेरिकेने नाटो सदस्य देशांना रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा सल्ला दिल्यानंतर आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्यानंतर यूक्रेनने मोठे पाऊल उचलले आहे. यूक्रेनने भारतातून आयात होणाऱ्या डिझेलची खरेदी १ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा यूक्रेनमधील ऊर्जा सल्लागार कंपनी एनकोर हिने सोमवारी केली.
यूक्रेनचा आरोप
एनकोरच्या म्हणण्यानुसार, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो आणि त्याच तेलावर प्रक्रिया करून डिझेल निर्यात करतो. दरम्यान रशिया ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे यूक्रेनच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य करत असल्याने भारताकडून खरेदी होणाऱ्या डिझेलमध्ये रशियन घटक असू शकतो, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी यूक्रेनच्या सुरक्षा यंत्रणांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत.
डिझेल खरेदीचे प्रमाण
ऑगस्ट २०२५ मध्ये यूक्रेनने भारताकडून ११.९ लाख टन डिझेल आयात केले होते. हे प्रमाण त्यांच्या एकूण डिझेल आयातीपैकी १८ टक्क्यांपेक्षा जास्त होते. २०२२ मध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी यूक्रेन बेलारूस आणि रशियाकडून डिझेल खरेदी करत होता. अ-९५ या दुसऱ्या कन्सलटन्सीच्या माहितीनुसार, या वर्षीच्या उन्हाळ्यात यूक्रेनची एक मोठी रिफायनरी निकामी झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांना भारताकडून डिझेल घ्यावे लागले. अगदी संरक्षण मंत्रालयानेही सोव्हिएत काळातील मानकांनुसार डिझेल खरेदी केले होते.
डिझेल आयातीत घट
अ-९५ च्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत यूक्रेनची डिझेल आयात गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ टक्क्यांनी घटून २.७४ दशलक्ष मेट्रिक टन इतकी झाली आहे. भारत आखाती देशांच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे.

