(रत्नागिरी / वार्ताहर)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांची महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २०२६ साठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. आंबेकर गेली २७ वर्षे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्ट्स विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून नाट्य, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे या संस्थेतर्फे १९६३ पासून पुणे विद्यापीठ स्तरावर ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील महाविद्यालयीन नाट्यचळवळीला दिशा देणारी ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
सन २०१० पासून पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या केंद्रांवर प्राथमिक फेऱ्यांचे आयोजन केले जाते. या केंद्रांतील विजेत्या एकूण २० संघांना डिसेंबर महिन्यात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे या महाअंतिम स्पर्धेचा संपूर्ण खर्च महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे ही संस्था कोणत्याही प्रायोजकांशिवाय उचलते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक चळवळीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. ही नियुक्ती महाराष्ट्रीय कलोपासक, पुणेचे चिटणीस राजन ठाकुरदेसाई आणि खजिनदार सुहास नांगरे यांनी जाहीर केली.
डॉ. आंबेकर यांच्या नियुक्तीबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, कार्यकारी सदस्य डॉ. संजय केतकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. सीमा कदम तसेच महाराष्ट्रीय कलोपासक, पुणेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

