(कोल्हापूर)
कौटुंबिक तणाव आणि मानसिक नैराश्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील तरुण दंतचिकित्सक अवधूत प्रकाश मुळे (वय 35) यांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना मोबाईलवर भावनिक संदेश पाठवले, ज्यात त्यांच्या आत्महत्येचा इशारा होता. या घटनेने कोल्हापूर आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर अवधूत मुळे यांची दुचाकी आढळली, त्यावर हाताने लिहिलेली चिठ्ठी सापडली. प्राथमिक तपासात दुचाकी अवधूत यांच्या नावावर असल्याचे पोलिसांना समजले. तलावाच्या परिसरात तपास करताना त्यांच्या पाठीवर दगड आणि विटांनी भरलेली बॅग आढळली, ज्यातून त्याने मृतदेह पाण्यावर येऊ नये म्हणून असे केले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी रात्री अवधूत यांनी जवळच्या मित्रांना पाठवलेल्या मोबाईल संदेशांमध्ये “मी पाठीवर दगड-विटा भरून तलावात उडी घेत आहे, मृतदेह बाहेर काढायला वेळ लागेल” असा इशारा दिला होता. या संदेशांवरून त्यांची मानसिक नैराश्याची स्थिती होती, अशी माहिती मित्रपरिवाराने पोलिसांना दिली आहे.
राजारामपुरी पोलिसांनी सुसाईड नोट आणि मोबाईल संदेश ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाची मदत घेऊन मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, कौटुंबिक तणावामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणाम होतात आणि त्यासाठी समाजात मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापनाविषयी जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे.

