(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने वर्ष 2025 चे प्रतिष्ठेचे चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा केली. यासंदर्भातील अधिकृत शासन परिपत्रकही सांस्कृतिक कार्य विभागाने प्रसिद्ध केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताला नवी उंची देणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी भावगीत, भक्तिगीत, शास्त्रीय संगीत आणि चित्रपटसंगीताच्या माध्यमातून भारतीय संगीतविश्वावर अमिट ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध कारकिर्दीचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, चित्रपती व्ही. शांताराम विशेष पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रसाद ओक यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, “लहानपणापासून व्ही. शांताराम यांचे चित्रपट पाहत मोठा झालो. ‘पिंजरा’पासून ‘दो आंखे बारह हाथ’पर्यंत प्रत्येक चित्रपटाने मला कलाकार म्हणून घडवले. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या सन्मानामुळे आनंदासोबतच जबाबदारीची जाणीव अधिक वाढली आहे. या पुरस्काराला भविष्यात माझ्या कामातून न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व निर्माता-दिग्दर्शक आणि प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.”
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज लेखक सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत ‘सलीम-जावेद’ ही अजरामर जोडी निर्माण केली. ‘शोले’, ‘दीवार’, ‘जंजीर’, ‘डॉन’ आणि ‘त्रिशूल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या कथा आणि पटकथांमुळे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवे परिमाण दिले. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना यंदाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जी यांनाही यंदाचा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘ब्लॅक’, ‘हम तुम’, ‘मर्दानी’, ‘वीर-झारा’ आणि ‘नो वन किल्ड जेसिका’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मने जिंकली आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठेचे सन्मान त्यांच्या नावावर आहेत.

