(मुंबई / वृत्तसंस्था)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. “देशात खासदारांची संख्या वाढवण्यापेक्षा रोजगाराच्या संधी वाढवा. बेरोजगार युवकांना रोजगार दिलात तर ते तुम्हाला आपोआप डोक्यावर घेतील,” असा टोला त्यांनी लगावला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ‘मार्मिक प्रबोधन शतक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेने सत्ताधाऱ्यांना विकास आणि जनहिताची कामे करण्यासाठी जनादेश दिला होता. सरकार मात्र सध्या फक्त विरोधी पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू आहे. डिलिमिटेशनचे विधेयक आणण्यासाठी पक्ष फोडले जात आहेत. जर सरकारला डिलिमिटेशन करून खासदारांची संख्या वाढवायची असेल, तर त्यापेक्षा देशातील तरुणांना रोजगार देण्यावर भर द्यावा. आज बेरोजगारीमुळे अनेक युवक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना रोजगार मिळाला, तर तेच युवक सरकारला डोक्यावर घेतील. प्रत्यक्षात यामागे वेगळेच राजकारण असून घटनात्मक बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
घराणेशाहीच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. “माझ्या घराणेशाहीवर टीका केली जाते. होय, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. आमच्या घराण्याचा शंभर वर्षांचा इतिहास आहे. पण ज्यांनी आमच्यावर टीका केली, त्यांच्या राजकीय प्रवासाचा आणि जबाबदारीचा इतिहास काय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेरा क्या, मैं तो झोला लेकर निकल जाऊंगा” या पूर्वीच्या वक्तव्याचा उल्लेख करत, “तुमच्यानंतर देशाचं काय?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही भाजपवर निशाणा साधला. “ज्या प्रभू रामांच्या नावावर सत्ता मिळवली, त्या रामाच्या मंदिरातील कथित गैरव्यवहारांबाबत तुम्हाला लाज वाटली नाही का? आम्ही हिंदुत्व सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी स्वतः काय सोडलं, याचं उत्तर द्यावं,” असे ते म्हणाले. याशिवाय एका आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या तरुणीचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लोकशाही संपत चालल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र देशातील तरुणांनी रस्त्यावर उतरून लोकशाहीला नवी ऊर्जा दिली आहे,” असेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
या भाषणातील डिलिमिटेशन, बेरोजगारी, घराणेशाही, राम मंदिर आणि लोकशाहीवरील वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

