(नाशिक / प्रतिनिधी)
अध्यात्मातून मन:शांती लाभते आणि मन:शांतीतूनच आपण जागतिक शांततेकडे यशस्वी वाटचाल करू शकतो असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र डॉ. श्री नितीनभाऊ मोरे यांनी केले.
परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने सेवामार्गातर्फे अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड या तीन देशांमध्ये जागतिक विश्वशांती महोत्सव नुकताच उत्साही वातावरणात गुरुपुत्र डॉ. श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये श्री. मोरे यांनी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सध्या जागतिक परिस्थिती पाहता आपणा सर्वांसाठी कठीण काळ सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वतःपुरता विचार करणे सोडून द्या, समष्टीचा विचार करा, अखिल मानव जातीच्या कल्याणाचे कार्य करा हा परमपूज्य गुरुमाऊलींचा संदेश पोहोचविण्यासाठी मी आलो आहे असे त्यांनी सांगताच सेवेकर्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना प्रतिसाद दिला.
श्री. मोरे यांच्या तीन देशांमधील सर्वच कार्यक्रमांना परदेशस्थ भारतीयांसह सेवेकऱ्यांची तसेच स्वामी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. त्यांच्या या विदेश दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी विश्वशांती महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळा स्थानिक भाविकांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये कार्यक्रम
अमेरिकेच्या बे एरियामध्ये (कॅलिफोर्निया) पादुका पूजन,बालसंस्काराचा उपक्रम, पालखी सोहळा, मुले आणि युवकांसाठी मूल्याधिष्ठित उपक्रम तर फिनिक्स (ऍरिझोना) शहरामध्ये श्री. मोरे यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा अनेकांनी लाभ घेतला. अटलांटामधील (जॉर्जिया) सेवेकर्यांनी गुरुपीठातून आलेल्या पादुकांचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले. अटलांटा येथील कार्यक्रमात प्रचंड सख्येने भाविक आणि सेवेकरी अमेरिकेच्या दहा राज्यातून उत्साहाने सहभागी झाले होते. ‘सेवा आणि संस्कार हेच खरे पूजन’ या विषयावर श्री. मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांना २०२६ च्या कॅलेंडरचे आणि विशेष कीटचे वाटप करण्यात आले.
कॅनडामधील ब्राम्प्टन शहरात झालेल्या कार्यक्रमात मातृ-पितृ पूजन, श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन, बालसंस्कार कार्यक्रम तसेच भक्तीपर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सेवा- संस्कार शांतीचा दिव्य संदेश देण्यात आला. प्रतिष्ठित नागरिक श्री. दीपक मलिक आणि श्री. मुरारीलाल थपलियाल यांची प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती होती. युनायटेड किंगडममधील न्यूकॅसल शहरात विविध कार्यक्रमासह डॉ. श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या आध्यात्मिक शंका समाधान आणि प्रश्नोत्तर सत्रामुळे अनेकांना प्रापंचिक आणि पारमार्थिक समस्यांवर वैयक्तिक मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. या महोत्सवात परमपूज्य गुरुमाऊलींच्या ऐंशी टक्के सामाजिक कार्य आणि वीस टक्के आध्यात्मिक कार्याविषयी मांडलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व ठिकाणी झालेले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांसह बाल संस्कार व युवा प्रबोधन आणि देश विदेश अभियान विभागाच्या प्रतिनिधींनी अविश्रांत परिश्रम घेतले. सर्वच ठिकाणच्या भाविकांनी या उपक्रमाचे पुन्हा-पुन्हा आयोजन करण्यात यावे अशी प्रेमळ सूचना केली.
युकेच्या स्पाइस एफएम स्टुडिओत मुलाखत
गुरुपुत्र डॉ. श्री.नितीनभाऊ मोरे यांची युकेच्या स्पाइस एफएम स्टुडिओत “अध्यात्म आणि सेवामार्गाची वाटचाल” या विषयावर सविस्तर मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत प्रसारित झाल्यानंतर स्थानिक नागरिकांची कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती. ही मुलाखत ऐकुन आम्ही भारावून गेलो, प्रभावित झालो अशी प्रतिक्रिया स्थानिक भाविक आणि स्वामी भक्तांनी व्यक्त केली.

