(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
देशभरात खळबळ उडालेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत अटक करण्यात आलेल्या सर्व 13 आरोपींविरुद्ध पहिले आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात 360 साक्षीदारांचे जबाब, 422 महत्त्वाची कागदपत्रे आणि 43 भौतिक पुरावे सादर करण्यात आले असून, आरोपींवर गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे आणि भ्रष्टाचारासह अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
सीबीआयने आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासाचा गुन्हेगारी स्वरूपाचा भंग आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप ठेवले आहेत. याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) कायदा, 2024 अंतर्गतही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व 13 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यापैकी बहुतांश आरोपी महाराष्ट्रातील असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
या प्रकरणाची सुरुवात 12 मे रोजी भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर झाली. 3 मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी आणि अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तक्रार मिळताच सीबीआयने त्याच दिवशी एफआयआर नोंदवून तपासाला सुरुवात केली.
तपासासाठी सीबीआयने 72 अधिकारी-कर्मचारी आणि 8 सायबर-फॉरेन्सिक तज्ज्ञांची विशेष पथके नियुक्त केली. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीसह विविध राज्यांतील 92 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर या सर्व पुराव्यांची वैज्ञानिक आणि डिजिटल फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान सीबीआयने काही आठवड्यांतच प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे मूळ ठिकाण शोधून काढल्याचा दावा केला आहे. तसेच प्रश्नपत्रिका लीक करणारे, ती पुढे पोहोचवणारे मध्यस्थ आणि तिचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण साखळी उघड झाल्याचे तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणातील पहिली अटक 13 मे रोजी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे तीन तज्ज्ञ असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय लीक झालेली प्रश्नपत्रिका पुढे पोहोचवणारे मध्यस्थ आणि ती कोचिंग सेंटरपर्यंत पोहोचवणाऱ्या दोन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.
आर्थिक व्यवहारांच्या तपासात सीबीआयने आरोपींची अनेक बँक खाती, लॉकर आणि एक डीमॅट खाते जप्त केले आहे. तसेच परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका पसरवण्याच्या कटात आरोपींचा सहभाग असल्याचे डिजिटल फॉरेन्सिक अहवाल आणि हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
सीबीआयने न्यायालयात दाखल केलेले हे पहिले आरोपपत्र या बहुचर्चित प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, पुढील तपासात आणखी आरोपी, आर्थिक व्यवहार आणि पेपरफुटीच्या नेटवर्कबाबत नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

