(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) धक्कादायक खुलासा केला आहे. तपासानुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमधूनच प्रश्नपत्रिका लीक करण्यात आली होती. विशेष म्हणजे, प्रेसमधील काही कर्मचाऱ्यांनी प्रश्नपत्रिका बुटात लपवून प्रेसबाहेर नेल्याचा दावा एसआयटीने केला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मुख्य कार्यालय आणि आग्रा येथे प्रिंटिंग प्रेस असलेली संबंधित कंपनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या परीक्षा प्रश्नपत्रिका छापण्याचे काम करत होती. याच प्रेसमध्ये देशातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची गोपनीय कागदपत्रेही छापली जात होती. मात्र, इतकी संवेदनशील जबाबदारी असूनही सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रिंटिंग प्रेसमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच नव्हते. कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर प्रभावी देखरेख किंवा तपासणीचीही कोणतीही व्यवस्था नव्हती. याच निष्काळजीपणाचा फायदा घेत काही कर्मचाऱ्यांनी गोपनीय प्रश्नपत्रिका बुटामध्ये लपवून सहजपणे प्रेसबाहेर नेल्या.
पोलिसांच्या तपासानुसार, प्रेसमधील कर्मचारी बाबूलाल कुशवाह आणि नरेश महौर उर्फ निकी यांनी TET प्रश्नपत्रिका चोरून ती त्यांचा माजी सहकारी सोनू कुमार दिवाकर याच्याकडे दिली. त्यानंतर सोनूने प्रश्नपत्रिकेच्या फोटोकॉपी काढल्या आणि मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्या सूचनेनुसार त्या इतर साथीदारांपर्यंत पोहोचवल्या. पुढे हे जाळे महाराष्ट्रात सक्रिय झाले आणि प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
दरम्यान, सोमवारी भिवंडी न्यायालयात शरण आल्यानंतर एसआयटीने सोनू कुमार दिवाकर याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सोनू कुमार दिवाकरने 2018 मध्ये कंपनी सोडली होती. मात्र, तो मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याच्या सातत्याने संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याशिवाय, फरार संशयितांपैकी एक पुण्यातील रहिवासी असून महाराष्ट्र सरकारचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या संशयिताने लीक झालेली प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. तो सुमारे 50 उमेदवारांच्या संपर्कात होता आणि प्रश्नपत्रिका विक्रीच्या साखळीत त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय आहे.
सध्या एसआयटीने मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याला अधिक पुरावे गोळा करण्यासाठी बिहारमधील समस्तीपूर येथे नेले आहे. त्याच्या चौकशीतून प्रश्नपत्रिका नेमकी किती उमेदवारांपर्यंत पोहोचली, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता आणि आर्थिक व्यवहार कसे झाले, याबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

