(मुंबई)
मुंबईहून शिर्डीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी आरोपीला अवघ्या काही तासांत अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. Railway Protection Force (RPF) कल्याण आणि Central Intelligence Bureau Kalyan यांच्या संयुक्त कारवाईत सनी कांबळे (23) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने गांजाच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
काय आहे घटना?
13 फेब्रुवारी रोजी गाडी क्रमांक 22223 CSMT – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस (डाउन) ही गाडी ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान KM 52/114 येथे पोहोचली असताना एका व्यक्तीने अचानक दगडफेक केली. या घटनेत C-1, C-3, C-4 आणि C-7 या डब्यांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काही डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. प्रवाशांनी मोबाईलवर चित्रीकरण केलेल्या व्हिडिओमध्ये दगडफेक करणारी व्यक्ती जवळच उभी राहून मोबाईलमधून फोटो काढताना दिसत असल्याचे समोर आले.
काही तासांत आरोपी ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच डिव्हिजनल सिक्युरिटी कंट्रोल रूमकडून सतर्कता जारी करण्यात आली. त्यानंतर आरपीएफ कल्याण आणि सीआयबी कल्याणच्या संयुक्त पथकाने कल्याणमधील पत्रीपूल परिसरात शोधमोहीम राबवून संशयिताला ताब्यात घेतले.
नशेत दगडफेक केल्याची कबुली
आरोपी सनी कांबळे हा मूळचा पुणे येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान त्याने गांजाचे अतिसेवन केल्यामुळे नशेच्या अवस्थेत रेल्वे रुळाजवळ येऊन दगड उचलले आणि प्रवाशांना घाबरवण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या वंदे भारत गाडीच्या डब्यांवर फेकल्याचे सांगितले.
या प्रकरणी आरपीएफ पोलीस स्टेशन कल्याण येथे रेल्वे कायदा कलम 153 आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याला आधारवाडी जेल येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

