( मुंबई )
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पाठिंबा मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेत त्यांच्या लढ्याला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि जनआक्रोश समितीच्या प्रतिनिधींनी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी लक्ष्मी ऑरगॅनिककडून ‘पी-फास’सारख्या घातक रसायनांचे उत्पादन होत असून त्यामुळे कोकणातील पर्यावरण, शेती आणि मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही वैयक्तिक किंवा राजकीय हेतूने नसून कोकणचा निसर्ग, पाणी आणि स्थानिकांचे जीवन वाचवण्यासाठी उभारलेला जनआंदोलन आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने या संघर्षाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, “जिथे गरज भासेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत ठामपणे उभी राहील.”
यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत, “संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना या लढ्यात तुमच्या पाठीशी आहे,” असे सांगितले.
या भेटीदरम्यान मनसेचे पदाधिकारी, विविध संघर्ष समित्यांचे प्रतिनिधी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

