(कोल्हापूर / भिवंडी)
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नासाठी वारंवार तगादा लावून धमकावत असल्याच्या रागातून प्रियकराने त्यांचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह मुंबईत नेऊन समुद्रात फेकून पुरावे नष्ट करण्याचा कटही आरोपीने रचला होता. मात्र, भिवंडीतील नातेवाईकाच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला. या प्रकरणी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय 40, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) याला भिवंडीतील नारपोली पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपासासाठी गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा न्यारे यांच्या पतीचे सुमारे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे आणि आरोपी प्रकाश पाटील यांचे प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. सुरेखा न्यारे या प्रकाश पाटीलकडे वारंवार लग्नासाठी आग्रह धरत होत्या. या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहितीही समोर आली आहे. २६ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील शेतात आरोपीने सुरेखा न्यारे यांचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून स्वतःच्या इको कारच्या डिकीत ठेवण्यात आला.
त्यानंतर आरोपी रात्रीभर प्रवास करत भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे आपल्या नातेवाईकाकडे पोहोचला. तेथे त्याने आपल्या भाच्याला संपूर्ण घटना सांगून मृतदेह मुंबईत नेऊन समुद्रात फेकण्यासाठी मदत मागितल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, ही माहिती ऐकताच घाबरलेल्या भाच्याने तातडीने नारपोली पोलिसांना याबाबत कळवले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारच्या डिकीतून मृतदेह ताब्यात घेत आरोपी प्रकाश पाटील याला अटक केली.
मृतदेहाचे शवविच्छेदन भिवंडी येथे करण्यात आले असून, त्यानंतर मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी कोल्हापूरला पाठवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
या प्रकरणी संदेश सर्जेराव मोरे (वय 27, रा. भिवंडी) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस या हत्येच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करत असून, आरोपीने गुन्ह्याचे नियोजन कसे केले, तसेच अन्य कोणी त्याला मदत केली का, याचाही शोध घेतला जात आहे.

