(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी येथे झालेल्या १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत विद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, तर ४ विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले. विशेष म्हणजे, विद्यालयाने सलग तीन वर्षे जिल्हा जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान कायम राखत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
१७ वर्षांखालील वयोगटात यशस्वी घाणेकर याने ५३ किलो वजनी गटात, भावेश सनगरे याने ५६ किलो वजनी गटात आणि श्रावणी कांबळे हिने ५८ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. तन्मय तायडे याने ५६ किलो वजनी गटात, तर प्रतिक माचिवले याने ७९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.
१९ वर्षांखालील वयोगटात तन्मय घाणेकर याने ६५ किलो, धीरज मायंगडे याने ६० किलो, प्रविणा गावडे हिने ५३ किलो, कार्तिकी देसाई हिने ६९ किलो, अमन पाचकुडवे याने ७१ किलो आणि शिवानी डावल हिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. यश घाणेकर याने ६० किलो, तर संकेत धामणे याने ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यार्थ्यांनी शाळा आणि संस्थेचा लौकिक वाढविला आहे.
सलग तीन वर्षे जिल्हा चॅम्पियनशिप मिळविल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक क्रीडाशिक्षक संतोष सनगरे आणि क्रीडाशिक्षक किशोर नलवडे यांचे अभिनंदन करण्यात आले.
मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, कोषाध्यक्ष संदीप कदम, सचिव विनायक राऊत, जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांच्यासह पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्यपदक विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक क्रीडाशिक्षकांचे अभिनंदन केले.
दरम्यान, सुवर्णपदक पटकावलेल्या नऊ विद्यार्थ्यांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


