( पुणे / वृत्तसंस्था )
देशभरात नीट (NEET) पेपरफुटी आणि विविध प्रवेश परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चर्चा सुरू असतानाच शिक्षणाचे माहेरघर आणि ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या कथित रॅकेटचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर आरोपांची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने सत्यशोधन समिती स्थापन करून चौकशी सुरू केली आहे.
प्रवेशाशिवाय पदवी देण्याचा आरोप
तक्रारदार महेश कदम यांच्या म्हणण्यानुसार, मुलगा साहिल कदम यांच्या पुढील शिक्षणासाठी ते विद्यापीठात चौकशीसाठी गेले असता वित्त व लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याने तीन वर्षांचे शिक्षण न घेता थेट B.Com चे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र मिळवून देण्याची ऑफर दिली. यासाठी सुरुवातीला ₹3 लाखांची मागणी करण्यात आली होती. नंतर हा व्यवहार ₹1.50 लाखांत निश्चित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
₹70 हजार ऑनलाइन, व्हॉट्सॲपवर पाठवले पदवी प्रमाणपत्र
महेश कदम यांच्या माहितीनुसार, त्यांनी सुरुवातीला ₹50 हजार ऑनलाइन पाठविल्यानंतर साहिल कदम यांच्या नावाने तीन वर्षांचे गुणपत्रक देण्यात आले. त्यानंतर आणखी ₹20 हजार ऑनलाइन भरल्यानंतर उर्वरित रक्कम पदवी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर देण्याचे ठरले. यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर B.Com चे पदवी प्रमाणपत्र पाठवण्यात आले. मात्र, त्यात प्रवेश वाडिया महाविद्यालयाचा दाखविण्यात आला होता. तसेच प्रमाणपत्रावर ‘University of Pune’ असा उल्लेख असल्याने संशय निर्माण झाला. सध्या विद्यापीठाचे अधिकृत नाव ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असल्यामुळे हे प्रमाणपत्र बनावट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
संबंधित आर्थिक व्यवहारात अडचण निर्माण झाल्यानंतर हा कथित प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महेश कदम यांनी रिपब्लिकन पक्षाचे डॉ. धम्मरत्न गायकवाड यांची भेट घेऊन विद्यापीठ प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. या कथित रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणाची सर्व माहिती आणि संबंधित कागदपत्रे सुमारे महिनाभरापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाकडे देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यांच्या मते, हा प्रकार केवळ विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक फसवणूक करणारा नसून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का देणारा आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणावर विद्यापीठातर्फे सांगण्यात आले की, साहिल कदम यांच्या पदवीसंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून सत्यशोधन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.

