(राजापूर)
वडिलोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने मारहाण केल्याची फिर्याद चुलते श्याम मुरलीधर सावंत (५८, रा. परूळे, जुवेवाडी, राजापूर) यांनी राजापूर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. त्यानुसार दीपक श्रीराम सावंत व अन्य तीन महीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार श्याम सावंत व दीपक सावंत हे नात्याने काका, पुतणे आहेत. त्यांच्यामध्ये वडीलोपार्जित घरावरून वाद असून त्या संदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. ८ मार्च रोजी रोजी ६.३० वा. दरम्याने श्याम सावंत व त्यांची पत्नी संगिता तसेच लहान भाऊ सुदाम असे परूळे येथील मुळ घरी आले असताना दीपक सावंत व अन्य तीन महिलांनी सामाईक घरावरुन कोर्टात जो वाद सुरु आहे त्याचा राग मनात धरून श्याम सावंत व त्यांची पत्नी व लहान भाऊ यांना मारण्यासाठी अंगावर धावून आले असे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी दीपक याने स्टीलच्या बाटलीने श्याम यांच्या डाव्या गालावर मारुन दुखापत केली तसेच शिविगाळी करून बघून घेण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१ (१), ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

