(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यातील पाषाण-बावधनधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या ४२ वर्षीय आयटी अभियंत्याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. विरेंद्र द्विवेदी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. १९ वर्षीय तरुण कार चालवत असल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातात कारचालकही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विरेंद्र द्विवेदी हे नियमितपणे नेकलेस गार्डन परिसरात धावण्याचा व्यायाम करत होते. सकाळी ते नेहमीप्रमाणे धावण्याचा सराव करत असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर धडक देणाऱ्या याच कारमधून द्विवेदी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातग्रस्त कार ‘ब्ल्यूरेज डेव्हलपर्स’ (BLUERAYS Developers) या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनाच्या नोंदणीशी संबंधित पत्ता ‘एबीआयएल हाऊस’ (ABIL House) असा असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार १९ वर्षीय तरुण चालवत होता. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच कारचालक पुण्यातील एका नामांकित बिल्डरचा मुलगा असल्याची चर्चा आहे. मात्र, चालकाची ओळख तसेच या दाव्याची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून अद्याप करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, कारचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह वाहनाचा वेग, चालकाची वैद्यकीय तपासणी आणि इतर बाबींचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या तपासानंतर अपघाताचे नेमके कारण आणि अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत.


