(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील कशेळी केंद्राची शिक्षण परिषद कशेळी नं. ४ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख सौ. समीक्षा संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर सखोल मार्गदर्शन, अभ्यासपूर्ण चर्चासत्र आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली.
परिषदेत विपश्यना मित्र उपक्रम यावर केंद्रप्रमुख सौ. समीक्षा पवार, निपुण अध्ययन आढावा यावर श्री. शिवाजी कोलते, शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी) पुनर्गठन यावर श्री. प्रतीक मोरे, समस्या निराकरण व अनुभवांची देवाणघेवाण यावर सौ. मेघा आडिवरेकर, अध्ययन निष्पत्तीनुसार मासिक नियोजन यावर सौ. प्रियांका चव्हाण, तर शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन या विषयावर श्री. मिलिंद नार्वेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विषयतज्ज्ञांनी उपस्थित शिक्षकांच्या शंकांचे निरसन करत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.
या शिक्षण परिषदेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुतार, केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक श्री. संतोष रूमडे, श्री. सुनिल जायदे, श्री. अनंत डोल, श्री. मनोज मिरगुळे, सौ. पूर्वा दातार, श्री. अमोल नांदवटे, श्रीमती नेहा पवार यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीच्या दृष्टीने प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर विशेष लक्ष केंद्रित करावे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवावे, यासाठी सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रप्रमुख सौ. समीक्षा संतोष पवार यांनी यावेळी केले.
शिक्षण परिषदेची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध परिपाठाने झाली. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रातील सर्व शिक्षक, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.

