(रत्नागिरी / वार्ताहर)
तिवरे धरण दुर्घटनेत जीव गमावलेल्या आणि बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते अलोरे येथे पार पडले. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला प्रकल्पग्रस्तांना हक्काची घरे सुपूर्द करून शासनाने दुर्घटनेच्या वेळी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपये खर्चून सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यात यश आले असून, हा देशातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरला असल्याचे डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले.
तिवरे भेंदवाडी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत अलोरे येथील घर क्र. २५ ते ४३ तसेच तिवरे येथील ४४ ते ५७ या घरांच्या बांधकामांचे लोकार्पण चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाधित कुटुंबीयांना सदनिकांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांना घरे देणे हे उपकार नव्हे, कर्तव्य : डॉ. उदय सामंत
लोकार्पण सोहळ्यात बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना घरे देऊन कोणतेही उपकार केलेले नाहीत, तर हे आमचे कर्तव्य होते. दुर्घटनेच्या वेळी दिलेला शब्द आज प्रत्यक्ष पूर्ण होत आहे.” यंदाच्या गणेशोत्सवात या घरांपैकी एका जरी घरात बाप्पाची प्रतिष्ठापना झाली, तरी तो आपल्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तिवरे गावासारखी दुर्दैवी परिस्थिती देशात पुन्हा कोणावरही येऊ नये, अशी प्रार्थना गणरायाचरणी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. नवीन वस्तीत सर्वांनी एकोप्याने आणि जबाबदारीने राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
रुद्रच्या भवितव्याची काळजी घेणे समाजाचे कर्तव्य
तिवरे धरण दुर्घटनेतून बचावलेल्या छोट्या रुद्रच्या घराचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. रुद्रच्या भवितव्याबाबत विशेष भावना व्यक्त करताना डॉ. सामंत यांनी त्याला देशाचा सुजाण आणि यशस्वी नागरिक घडविण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येकाची असल्याचे सांगितले. त्याचे संवेदनशीलतेने पालनपोषण व्हावे, तसेच तो सज्ञान झाल्यानंतर त्याची मालमत्ता आणि सर्व हक्क सुरक्षितपणे त्याच्या स्वाधीन व्हावेत, यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासकीय बांधकामांच्या गुणवत्तेबाबत डॉ. सामंत यांची कठोर भूमिका
शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे, यावर भर देताना डॉ. सामंत यांनी शासकीय बांधकामे दर्जेदार आणि अव्वल दर्जाचीच झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश दिले. कोणत्याही कामात निकृष्ट दर्जा आढळल्यास त्याची तात्काळ सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी प्रास्ताविकातून पुनर्वसन प्रकल्पाची पार्श्वभूमी मांडली. आमदार शेखर निकम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.


