(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामीण शिक्षणाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संगमेश्वर तालुक्यात अवघ्या १ ते ५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल ६५ शाळा सध्या सुरू असून, पटसंख्या वाढली नाही तर येत्या काळात या शाळांना टाळे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
सन २००९ मध्ये संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४४० प्राथमिक शाळा कार्यरत होत्या. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता ओढा, ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर, जन्मदरातील घट आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे ही संख्या आता ३२१ वर आली आहे. यंदाही शून्य पटसंख्येमुळे दोन शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
सध्या तालुक्यात एकाच विद्यार्थ्यावर सुरू असलेल्या पाच शाळा आहेत. त्यामध्ये ताम्हाणे, कुंभारखणी खुर्द बौद्धवाडी, साखरपा खांदवाडी, चाफवली भटाचा कोंड आणि पिरंदवणे घेवडेवाडी या शाळांचा समावेश आहे. याशिवाय दोन विद्यार्थी असलेल्या १५, तीन विद्यार्थी असलेल्या १५, चार विद्यार्थी असलेल्या १३ आणि पाच विद्यार्थी असलेल्या १७ शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळा अत्यल्प पटसंख्येमुळे भविष्यात बंद होण्याच्या धोक्याच्या छायेत आहेत.
शिक्षण विभागासमोर केवळ पटसंख्या हा मुद्दा नसून ग्रामीण भागातील शिक्षणाचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. कमी विद्यार्थी असल्याच्या कारणावरून शाळा बंद करणे हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. मराठी भाषेचे संवर्धन, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी आणि गावागावातील शैक्षणिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.
यासाठी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागासह ग्रामपंचायती, पालक, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करणे, वर्गखोल्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्तरावर ‘शाळा वाचवा’ मोहीम राबविणे ही काळाची गरज बनली आहे.
ग्रामीण शिक्षणाचा वारसा आणि मराठी माध्यमाचे अस्तित्व जपायचे असेल, तर संगमेश्वर तालुक्यातील या शाळा वाचवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याची भावना शिक्षणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

