(लांजा / वार्ताहर)
मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पुढे राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रायबर कारला वाकेड पुलावर मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकेड पुलावर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनआर (एमएच ४६ एपी १९७४) मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जात होती, तर ट्रायबर (एमएच ४८ बीएच ८५५१) मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात होती. वाकेड पुलावर वॅगनआर चालकाचे पुढील ट्रायबरवरील नियंत्रण चुकल्याने वॅगनआरने ट्रायबरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
अपघातात वॅगनआरमधील ध्रुव जितेंद्र मापारी (वय १६, रा. वेरली सडे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) तसेच ट्रायबरमधील उत्तम परशुराम मिस्त्री (वय ६१) आणि मंगला उत्तम मिस्त्री (वय ६०, दोघेही रा. कुंभवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले. जखमींपैकी दोघांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच वाकेड पोलीस मदत केंद्राचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जिजाऊ संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी तत्परतेने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.
दरम्यान, अपघातामुळे वाकेड पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला हटविल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली. लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कदम, विष्णू मांजरेकर आणि सुयोग वाडकर यांनी घटनास्थळी दाखल होत आवश्यक कार्यवाही केली. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


