(संगमेश्वर / प्रतिनिधी)
व्यापारी पैसा फंड संस्था, संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलमधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीत तब्बल २४ बाल गणेश मूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका निशा निमले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या कलात्मक उपक्रमाचे व्यापारी पैसा फंड संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले. संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी बालकलाकारांचे अभिनंदन करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
गणेशोत्सवात गणेशमूर्तीला विशेष महत्त्व असते. गणेशमूर्तीची रचना कशी असते, ती कोणत्या मातीपासून तयार केली जाते तसेच हाताने मूर्ती घडविताना कोणती साधने वापरली जातात, याची विद्यार्थ्यांना बालवयात प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पैसा फंड इंग्लिश स्कूलमधील इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून सुबक बाल गणेशमूर्ती तयार केल्या.
मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत सुमारे दोन तास उत्साहाने सहभाग घेतला. चिमुकल्या हातांनी गणेशमूर्तीला आकार देताना विद्यार्थी पूर्णपणे तल्लीन झाले होते. यावेळी प्रशालेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही बालकलाकारांना सहकार्य केले.
व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी गणेशमूर्ती तयार करण्याच्या उपक्रमाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी सर्व बालकलाकारांसह मार्गदर्शक शिक्षिका निशा निमले यांचे अभिनंदन केले. कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पैसा फंड प्रशालेतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. शाडू मातीत गणेशमूर्ती घडविण्याचा उपक्रम हा त्याचाच एक भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमाबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष व मूर्तिकार किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर आणि पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदींनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका निशा निमले यांचे अभिनंदन केले.


