(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
तालुक्यातील कडवई बाजारपेठेत भरदिवसा घडलेल्या कार फोडीच्या थरारक घटनेनंतर आता या संपूर्ण प्रकारामागचे खरे कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तलवार आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने वाहनावर सपासप प्रहार करणाऱ्या संशयिताचा नेमका संताप कोणत्या कारणाने अनावर झाला, याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
घटनेत संशयित सुरेश दाजी इंजळे याने संबंधित कारवर आक्रमकपणे हल्ला चढवला; मात्र वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये घटनास्थळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ महिलेशी कोणताही स्पष्ट वाद किंवा प्रत्यक्ष चिथावणी देणारा प्रसंग दिसून येत नाही. त्यामुळे गाडीवर एवढ्या आक्रमक पद्धतीने हल्ला करण्यामागे केवळ क्षणिक राग होता की यामागे आधीपासून साचलेला वैयक्तिक वाद दडलेला आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे लक्ष्य केलेली होंडा सिटी कार नेमकी का निवडली गेली, याविषयीही उत्सुकता वाढली आहे. वाहनमालकाशी संबंधित जुना वाद, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक मतभेद की अन्य कोणते कारण या घटनेमागे आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
या प्रकरणात संगमेश्वर पोलिसांनी सुरेश इंजळेवर गुन्हा दाखल केला असला तरी तपासादरम्यान त्याची पत्नी स्नेहल सुरेश इंजळे हिचाही सहभाग स्पष्ट झाल्याने तिच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका हिंसक प्रकारात पती-पत्नी दोघांचाही सहभाग यामुळे या घटनेला अधिक गंभीर व उत्सुकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याकडून सुरू असलेल्या तपासात आता कोणते नवे धागेदोरे समोर येतात, संशयित आरोपींच्या चौकशीतून नेमके कोणते कारण उघड होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसेच ही केवळ क्षणिक संतापातून घडलेली घटना आहे, की त्यामागे खोलवर दडलेले काही संबंध आणि वाद आहेत याचे उत्तर आता पोलिस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

