(संगमेश्वर / वार्ताहर)
मुंबईहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या जादा एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीनजीक खेरशेत-कासे फाटा येथे अपघात झाला. ब्रेक न लागल्याने एसटी बसने पुढे असलेल्या सोळा टायर ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
या धडकेनंतर एसटी बसने मारुती वॅगनआर कारलाही मागून धडक दिली. अपघातात एसटीमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दुखापत झाली असून, अन्य प्रवाशांना मुकामार लागला आहे.
अपघातग्रस्त एसटी बस महामार्गावर असल्याने या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. छायाचित्रात कासे फाटा येथे अपघातग्रस्त झालेली सावंतवाडीकडे जाणारी एसटी बस दिसत आहे.


