(फुणगूस / एजाज पटेल)
फुणगूस येथील प्रसिद्ध शास्त्री खाडीकिनारा सध्या चविष्ट ‘शिलव्या’ (शिंपल्या) काढण्यासाठी गजबजून गेला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर खाडीच्या गाळात आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात शिलव्या उपलब्ध होत असल्याने स्थानिक महिला, पुरुष तसेच खवय्यांनी खाडीकिनाऱ्यावर मोठी गर्दी केली आहे.
शास्त्री खाडीपात्रात नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात शिलव्या आढळतात. भरती-ओहोटीची वेळ साधून ग्रामस्थ सकाळपासूनच खाडीकिनाऱ्यावर दाखल होतात. भरतीच्या वेळी पाण्यात, तर ओहोटीच्या वेळी उघड्या पडणाऱ्या चिखलातून मोठ्या मेहनतीने शिलव्या गोळा केल्या जातात. अनेक कुटुंबांसाठी हा हंगामी उपजीविकेचा महत्त्वाचा आधार ठरत असून, घरच्या वापरासह विक्रीतूनही उत्पन्न मिळत आहे.
कोकणातील किनारपट्टीवर शिलव्यांना मांसाहारी खवय्यांमध्ये विशेष मागणी असते. वैशिष्ट्यपूर्ण चव, पौष्टिक गुणधर्म आणि ताजेपणामुळे स्थानिक बाजारातही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या प्रारंभी मिळणाऱ्या ताज्या शिलव्यांची चव चाखण्यासाठी परिसरातील नागरिकही आवर्जून फुणगूसच्या शास्त्री खाडीकिनारी दाखल होत आहेत.
सध्या सकाळ-संध्याकाळ शेकडो महिला व पुरुष शिलव्या शोधण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आबालवृद्धांच्या उत्साही सहभागामुळे शास्त्री खाडीकिनारा गजबजून गेला असून, संपूर्ण परिसराला जणू पारंपरिक सागरी उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

