(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर भागात चोरट्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, आता शासकीय मालमत्तांनाही लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पैसाफंड हायस्कूलजवळील बीएसएनएल कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि टॉवरच्या कॉपर व ॲल्युमिनियमच्या किमती प्लेट्ससह एकूण १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार, बीएसएनएल कंपनीत कनिष्ठ दूरसंचार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले फिर्यादी उमेश सदाशिव शिरसाट, रा. माभळे, ता. संगमेश्वर, हे त्या रात्री कार्यालयासमोरील उड्डाणपुलाखाली झोपलेले होते. याच संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील किमती साहित्य चोरून तो पसार झाला.
चोरट्याने ५ हजार २५० रुपये किमतीची, १५ किलो वजनाची, ३.५ फूट लांब व ४ इंच रुंद कॉपर प्लेट, ८ हजार ४०० रुपये किमतीच्या लहान ४८ कॉपर प्लेट्स तसेच ६०० रुपये किमतीच्या ३ ॲल्युमिनियम प्लेट्स असा एकूण १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
भरवस्तीत, मुख्य रस्त्यालगत आणि हायस्कूलजवळ असलेल्या शासकीय कार्यालयात अशा प्रकारे चोरी झाल्याने चोरट्यांची वाढती हिंमत स्पष्ट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी उमेश शिरसाट यांच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीचा तात्काळ तपास करून अज्ञात चोरट्याचा सुगावा लावावा आणि त्याला बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

