(संगमेश्वर / एजाज पटेल)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना संगमेश्वर येथे घडली आहे. नालासोपारा-रत्नागिरी या लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी बस सोमवारी रात्री संगमेश्वर बसस्थानकात अचानक बंद पडल्याने प्रवाशांना आणि चालक-वाहकांना मिळून बसला धक्का देत सुरू करण्याची वेळ आली. या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
हेडलाईट बंद; तात्पुरत्या बल्बच्या प्रकाशात प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, बसचे मुख्य हेडलाईट निकामी झाल्याने चालकाला अंधारात बस चालवणे कठीण झाले. त्यानंतर बसमधील बॅटरीला वायर जोडून बाहेर तात्पुरता बल्ब लावून उर्वरित प्रवास सुरू ठेवण्यात आला. कोकणातील घाटरस्ते आणि तीव्र वळणांच्या पार्श्वभूमीवर अशा स्थितीत बस धावल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भररस्त्यात प्रवाशांनी बसला दिला धक्का
बस अचानक बंद पडताच चालक-वाहकांसह प्रवाशांनाही बस ढकलावी लागली. लांब पल्ल्याच्या मार्गावर अशा नादुरुस्त बस सोडल्या जात असल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चालक-वाहकांनाही मनस्ताप
सकाळपासून शेकडो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या चालक आणि वाहकांनाही या घटनेमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहनातील बिघाड असूनही प्रवाशांना सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येत असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्याची आठवण
काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकण दौऱ्यात बसस्थानके आणि उपहारगृहांची पाहणी केली होती. मात्र, या घटनेनंतर प्रवाशांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत, “मंत्र्यांनी प्रत्यक्ष अशा जुन्या एसटीत बसून प्रवास करावा, म्हणजे प्रवाशांच्या अडचणी आणि चालक-वाहकांची व्यथा लक्षात येईल,” अशी भावना व्यक्त केली.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नादुरुस्त बस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे. तसेच कोकणातील लांब पल्ल्याच्या मार्गांवर तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या आणि सुरक्षित बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे.

