( मुंबई )
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, कृषी मंत्री दत्ता भरणे, खासदार सुनील तटकरे, उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे,दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे,भास्कर जाधव, महेंद्र दळवी, किरण सामंत कोकणातील सर्व आमदार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते.
मुंबईतील विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आंबा व काजू पिकांच्या नुकसानीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत हवामानातील बदलामुळे आंबा आणि काजू पिकांना झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडली. त्यावर त्यांनी संवेदनशील भूमिका घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.
“कोणत्याही परिस्थितीत आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांना न्याय मिळेल आणि झालेल्या नुकसानीची भरपाई समाधानकारक पद्धतीने दिली जाईल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ही नुकसानभरपाई याच आर्थिक वर्षात देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या निर्णयामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

