(तरवळ / अमित जाधव)
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्षपदी जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यप्रेमी प्रा. हनुमंत नारसिंह कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद मोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांनी त्यांची २०२८ पर्यंत या पदावर नियुक्ती केली आहे.
प्रा. कदम यांनी मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय तसेच मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज येथे अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेसोबतच मराठी भाषा, साहित्य आणि सामाजिक कार्यातील योगदानामुळे त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे.
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील असलेले प्रा. कदम गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यास असून त्यांनी शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास असून उत्कृष्ट निवेदक म्हणूनही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मराठी साहित्याचा प्रसार ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहोचविणे, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्य चळवळीला बळकटी देणे, या उद्देशाने त्यांच्यावर जिल्हा कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रा. कदम हे कवी केशवसुत स्मारक समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

