(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील केदार सखाराम टेमकर यांनी आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक कलाकृतीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
युद्धजन्य परिस्थिती आणि इंधन टंचाईसारख्या ज्वलंत विषयावर आधारित वास्तववादी रांगोळी साकारत केदार यांनी परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या उत्कृष्ट कलाकृतीस प्रथम क्रमांकासह १० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक निलेश भाऊसाहेब सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागांतून कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रंग, कल्पकता आणि सामाजिक संदेशांनी परिपूर्ण रांगोळ्यांद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढवली.
स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक – केदार सखाराम टेमकर (कुडाळ, सिंधुदुर्ग)
द्वितीय क्रमांक – विलास विजय रहाटे (देवरुख, रत्नागिरी)
तृतीय क्रमांक – मनोज नारायण चव्हाण (कर्जत, मुंबई)
उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते :
अभिषेक आनंद सुतार (भांडुप, मुंबई)
अक्षय शिवाजी वहाळकर (देवरुख, रत्नागिरी)
गौरव रमेश सुर्वे (रत्नागिरी)
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. स्पर्धकांनी सादर केलेल्या सर्जनशील आणि संदेशप्रधान कलाकृतींमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून उपस्थितांकडून त्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

