(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे येथील प्रतिष्ठित नागरिक व निवृत्त पोस्टमन जयप्रकाश गोपाळ शिंदे (वय ७८) यांचे १९ मार्च रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
जयप्रकाश शिंदे यांनी कसबा पोस्ट कार्यालयात अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श पोस्टमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सेवाकाळात त्यांनी जबाबदारीने आणि आपुलकीने काम करत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता.
निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग सुरू ठेवला होता. संगमेश्वर संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे ते क्रियाशील सदस्य होते. याशिवाय, एक कुशल कबड्डीपटू म्हणूनही त्यांची ओळख होती.
त्यांचा स्वभाव प्रेमळ व मनमिळावू असल्याने सर्व स्तरातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

