(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पालवे यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी मितीश मदन केणी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेत प्रत्यक्ष सेवेला सुरुवात केली.
मितीश केणी हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पोईप गावचे रहिवासी आहेत. कोकणातील सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीची त्यांना चांगली जाण असल्याने त्यांच्या अनुभवाचा लाभ संगमेश्वर तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संगमेश्वर येथे रुजू होण्यापूर्वी केणी हे रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा यशस्वी तपास केला होता.
मुंबईपासून एसीबी आणि सीआयडीपर्यंतचा दांडगा अनुभव
मितीश केणी यांचा पोलीस दलातील प्रवास विविध जबाबदाऱ्यांनी समृद्ध आहे. २०१० ते २०१४ या कालावधीत त्यांनी मुंबईतील धारावी आणि सायन पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्यानंतर त्यांची नियुक्ती सिंधुदुर्ग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) येथे झाली. या काळात त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कारवाईत प्रभावी कामगिरी बजावली. पुढे त्यांनी मुंबईतील चर्चगेट येथील अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयात प्रशासकीय जबाबदारी सांभाळली.
यानंतर कल्याण येथील गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास करून आपल्या तपासी कौशल्याची छाप पाडली.
२०२४ मध्ये बाणकोटची धुरा, आता संगमेश्वरची जबाबदारी
वर्ष २०२४ मध्ये बाणकोट पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळल्यानंतर आता त्यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे.
मुंबईतील संवेदनशील पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय आणि सीआयडीसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केल्यामुळे त्यांच्याकडे प्रशासकीय आणि तपासाचा मोठा अनुभव आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करणे, अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करणे, गुन्हेगारीवर वचक बसवणे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व न्याय्य पोलीस सेवा उपलब्ध करून देणे, याला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मितीश केणी यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी स्वागत केले असून, त्यांच्या अनुभवाचा संगमेश्वरच्या पोलीस प्रशासनाला निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

