( पुणे / वृत्तसंस्था )
शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरात पोत्यामध्ये आढळलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाचे गूढ शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत उलगडले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटनेच मित्राचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली असून, आरोपीच्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) याची 24 ते 26 जुलैदरम्यान हत्या करण्यात आली. 26 जुलै रोजी दुपारी करंजेनगर येथील मोकळ्या मैदानातील झुडपामध्ये एका पोत्यात त्याचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृताची ओळख पटत नसल्याने शिक्रापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सोशल मीडियावर मृताचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले. त्यानंतर मृताची ओळख गौरव उर्फ अक्षय वायकर अशी पटली.
तपासादरम्यान गौरव हा मुकेश विठ्ठल सोनवणे (वय 19) आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय 19) यांच्यासोबत करंजेनगर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान मुकेश सोनवणे याने अनैतिक संबंधाच्या संशयातून गौरवचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पत्नी जान्हवीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून करंजेनगर परिसरातील निर्जन झुडपात टाकल्याचेही तपासात उघड झाले.
या प्रकरणी मयताची आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुकेश विठ्ठल सोनवणे आणि जान्हवी अनिल पाटोळे या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर करून पुढील पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

