(नवी मुंबई)
कोपरखैरणे परिसरात घडलेल्या एका धक्कादायक दुर्घटनेत इमारतीचा स्लॅब कोसळून 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 10 विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
कोपरखैरणे सेक्टर 2, प्लॉट क्रमांक 12 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये ही घटना घडली. या सोसायटीच्या तळमजल्यावर घरगुती शिकवणीचे वर्ग चालत होते. गुरुवारी (5 मार्च) सायंकाळी साधारणपणे 5 ते 5.15 वाजण्याच्या दरम्यान पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला आणि खाली सुरू असलेल्या वर्गावर मलबा पडला.
या दुर्घटनेत मनीश मसे (वय 14) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. इतर 10 विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. काही विद्यार्थ्यांवर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. मुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले की, सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विद्याभावन नावाची ही इमारत साधारण 1997 साली बांधण्यात आली असून यामध्ये एकूण 8 कुटुंबे वास्तव्यास आहेत. स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने इमारतीमधील इतर सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी वाशी रुग्णालयात भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. या दुर्घटनेनंतर शहरातील जुन्या इमारतींची सुरक्षितता आणि निवासी इमारतींमध्ये सुरू असलेल्या घरगुती ट्युशन वर्गांची कायदेशीरता यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

