(जैतापूर / राजन लाड)
आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मालवणी बोलीभाषा सातासमुद्रापार पोहोचवणारे आणि मालवणी भाषेला जागतिक रंगभूमीवर मानाचे स्थान मिळवून देणारे राजापूर तालुक्यातील माडबन गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नाटककार तथा ‘वस्त्रहरण’कार कैलासवासी गंगाराम महादेव गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त २८ ऑक्टोबर रोजी मालवण येथे विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवणच्या मातीशी अतूट नाते जपणाऱ्या गवाणकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘अशा या दोघी’ या दोन अंकी नाटकाचा विशेष प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात हा स्मृतिसोहळा रंगणार आहे. सायंकाळी ठीक ६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कै. गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येईल. यावेळी त्यांच्या जीवनप्रवासाचे आणि साहित्यिक व नाट्य क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले जाणार आहे. त्यानंतर लगेचच ‘अशा या दोघी’ या नाटकाचा प्रयोग सुरू होईल.
अष्टपैलू कलानिकेतन आयोजित आणि देऊळकर प्रॉडक्शन निर्मित या नाटकाची निर्मिती रोहिणी रवींद्र देऊळकर यांनी केली आहे. कै. गवाणकर यांचे परममित्र आणि ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र देवधर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, रामानंद सागर यांच्या जगप्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेत राजा दशरथाची अजरामर भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत गवाणकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे.
‘अशा या दोघी’ या नाटकात राजेंद्र कदम, कुणाल आंगणे, संजीव शेडगे, योगिता सावंत, जितू तिरोडकर आणि मिनु देऊळकर हे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. नाटकाला प्रफुल्ल गोसावी यांचे संगीत लाभले असून, प्रकाशयोजना धनश्री कुमठेकर यांची आहे. रंगभूषेची जबाबदारी जितू तिरोडकर यांनी सांभाळली आहे, तर निर्मिती सहाय्य सुजाता शेलटकर आणि सुनिल परुळेकर यांचे आहे.
कै. गंगाराम गवाणकर यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मालवणमधील कलाकार आणि त्यांच्या मित्रपरिवाराने या संपूर्ण स्मृतिसोहळ्याचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, ‘अशा या दोघी’ या नाटकाचा प्रयोग सर्व नाट्यप्रेमींसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. मालवणसह संपूर्ण कोकणातील रसिक प्रेक्षकांनी आणि नाट्यप्रेमींनी सायंकाळी ६ वाजल्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे भावपूर्ण आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


